Monday, October 2, 2017

मजल

कवितेच्याही पुढे जराशी मजल करू दे
मनासारखी एक मलाही गझल करू दे

अजून नाही कोणालाही ओळख माझी
दुनियेला या मला बघूनी नवल करू दे

नेहमीच मी कर्तव्यांचा भरणा केला
थोडीशी मज हक्कांचीही उचल करू दे

मी तर सारे प्रश्न तुझे हे सोडवले बघ
माझ्या प्रश्नांचीही आता उकल करू दे

व्यवहाराचे जगणे माझे असेल चुकले
माणुसकीचे जगणे माझे सफल करू दे

- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

No comments:

Post a Comment