पूजन
( वृत्त- अनलज्वाला, बहुस्वरी अलामत )
नास्तिक झालो, मी मूर्तीचे भंजन केले
माणसातल्या माणुसकीचे पूजन केले
माझ्यासाठी समान येथे मानव सारे
मी नाही धर्मात कधीच विभाजन केले
हात जोडुनी डोळे माझे मिटले मी, पण
विज्ञानाला डोळ्यांमधले अंजन केले
दंतकथांच्या मागे नाही गुरफटलो मी
इतिहासाच्या सत्यकथेंचे सर्जन केले
पाप आणि पुण्याची आता कुणास चिंता
मी हृदयाच्या दुःखाचे परिमार्जन केले
- श्रीकांत चवरे
नाशिक
No comments:
Post a Comment