गज़ल

तुला पाहिजे का लगागा लगागा

(भुजंगप्रयात )
मनाला कवीते किती हाय त्रागा...
तुला पाहिजे का लगागा लगागा ?

कधी ओळ येते खयालात थोडी
कधी आशयाचा सुटे एक धागा...

दिले हाय आशीष की शाप आहे ?
कवी नेमका या विचारात जागा

तसा मूळचा खूप दिलदार आहे,
मला पाहिजे तेवढे शब्द मागा ...

छुपे सर्व मी जाणतो बेत आता
कितीही गड्यांनो इशार्‍यात वागा

कधी लावले एकही रोप नाही 
म्हणे, "सर्वजागी फुलाव्यात बागा "

- श्रीकांत चवरे 
नाशिक / अकोला

Sunday, October 15, 2017

कसा सांग विसरू तुझा हा इशारा


कसा सांग विसरू तुझा हा इशारा
हवा भेटता पेट घेतो निखारा

किती भ्रष्ट मी, हे मला बोलताना 
खरे आपल्याही मनाला विचारा

चढे वीष माझ्यात या जीवनाचे
मला फक्त आता गझल ही उतारा

जरासे तरी दुःख येतेच मित्रा
सुखाचा इथे द्या कितीही पहारा

मला या सुखाचे न अप्रूप काही
नसे आणि दुःखातही तीटकारा

अशी कार्यशाळा न येणार कामी
स्वतःलाच पाण्यात आधी उतारा

न मी लावली नाममुद्रा कधीही
तखल्लूस माझा कुणाही विचारा

- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

वेदना मिसर्‍यात या ठासून आली

वेदना मिसर्‍यात या ठासून आली
ही गझल दुःखातही हासून आली

झोप गेली नेहमी डोळ्यातली या,
तू मला जेव्हाकधी भासून आली

त्रासुनी मजला सखे होतीस गेली,
तू परत माझ्याकडे त्रासून आली

धीर माझा सोडला नाही, जरीही
संकटे ही रोज आ वासून आली

भेटला होता दगा झाले बरे हे,
ही नजर आता नवी तासून आली

लेखणी ही नेहमी निर्भीड माझी,
उंबरे नच ही कधी घासून आली

- श्रीकांत चवरे
   नाशिक 
10-10-2017   

वेदनांना साहुनी वैराण होते

वेदनांना साहुनी वैराण होते 
एवढी कविता कशी हैराण होते ?

भासते आहे अजुन कळ काळजाला
लोचनांचे दोन तिरपे बाण होते

आजही पडतो मनाला प्रश्न राणी
गुंतले दगडात का हे प्राण होते ?

ये बरा आलास मरणा शेवटी तू
केवढे माझ्या जिवाला ताण होते

एवढा दुःखास मीही प्रीय झालो,
मांडले त्याने नशीबी ठाण होते

4-09-15
- श्रीकांत चवरे
   नाशिक

Thursday, October 12, 2017

पुरे जाहले हे तुझे जाच आता

पुरे जाहले हे तुझे जाच आता
मिळालेत रे बोट हे पाच आता

जमान्या किती ठेचली जात माझी 
उभारून मीही असे टाच आता

निघे भाग्य माझे मुठीतून माझ्या 
तुझ्या तूच रेषेतले वाच आता

तुझी चाकरी आज लाथाडली मी
तुझ्या त्या भ्रमाचे फुटे काच आता

तुझे हासणे भेटणे हे दिखावे
नको दाखवू ही अरे लाच आता

मला भेटले दिव्य हे ज्ञान आहे
तुला लागली वाटते आच आता

( ही पण १० वर्ष जुनीच आहे )
- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

वेदना माझ्या खर्‍या मिसर्‍यात होत्या

वेदना माझ्या खर्‍या मिसर्‍यात होत्या
राहिल्या गझला तरी कचर्‍यात होत्या

लागला नाही कधी तुज थांगपत्ता
केवढ्या युक्त्या तुझ्या नवर्‍यात होत्या

टाळले तू नेहमी होकार देणे
पण खुणा प्रेमातल्या गजर्‍यात होत्या

चांदण्या तू माळल्या केसात जेव्हा,
चांदण्याही या किती नखर्‍यात होत्या

लाजरे माझे हृदय आहे तरीही
पेटल्या इच्छा किती बुजर्‍यात होत्या

तू स्वतःच्या पाहिल्या नाही उणीवा
पाहिल्या, ज्या नेमक्या दुसर्‍यात होत्या

- श्रीकांत चवरे
   नाशिक
11-10-2017

Wednesday, October 4, 2017

पुरे जाहले हे तुझे जाच आता



पुरे जाहले हे तुझे जाच आता
मिळालेत रे बोट हे पाच आता

जमान्या किती ठेचली जात माझी 
उभारून मीही असे टाच आता

निघे भाग्य माझे मुठीतून माझ्या 
तुझ्या तूच रेषेतले वाच आता

तुझी चाकरी आज लाथाडली मी
तुझ्या त्या भ्रमाचे फुटे काच आता

तुझे हासणे भेटणे हे दिखावे
नको दाखवू ही अरे लाच आता

मला भेटले दिव्य हे ज्ञान आहे
तुला लागली वाटते आच आता

( ही पण १० वर्ष जुनीच आहे )

- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

Monday, October 2, 2017

मजल

कवितेच्याही पुढे जराशी मजल करू दे
मनासारखी एक मलाही गझल करू दे

अजून नाही कोणालाही ओळख माझी
दुनियेला या मला बघोनी नवल करू दे

नेहमीच मी कर्तव्यांचा भरणा केला
थोडीशी मज हक्कांचीही उचल करू दे

मी तर सारे प्रश्न तुझे हे सोडवले रे
माझ्या प्रश्नांचीही आता उकल करू दे
व्यवहाराचे जगणे माझे असेल चुकले

माणुसकीचे जगणे माझे सफल करू दे

- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

सुवास

                     सुवास....

          ( वृत्त - अनलज्वाला )

थांबवण्याचा मीही केला प्रयास केवळ
तुझा मोगरा ठेवुन गेला सुवास केवळ

विचार आधी मीही राणी केला नाही
प्रेम करोनी जीव लावला पणास केवळ

व्यवहाराला बघत राहिला मेंदू माझा
हृदय बिचारे नित्य राहिले उदास केवळ

तुला आठवण असेल माझी अजून किंचित,
वेड्या या हृदयाचा वेडा कयास केवळ

गझलेवाचुन पान वहीचा रिता राहिला,
शेर अनामिक बोलत बसला समास केवळ...

कुणास जमले या वाटेवर चालुन जाणे ?
जे जे गेले, ते ते गेले लयास केवळ

- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

सहज

              सहज
         ( वृत्त -मेनका )

बोलणे त्यांना सहज का वाटते ?
ही स्थिती माझी उपज का वाजते ?

राहवेना एकही क्षण साजणे
तू मला माझी गरज का वाटते ?

भेटतो सर्वत्र जर अल्ला मला,
जीवनी जावेच हज का वाटते ?

सांगतो सा-यास गुन्हेगार तू,
आज तू झालास जज का वाटते ?

मी तुला समजून घेतो नेहमी 
अन् तुझी स्वार्थी समज का वाटते ?

बोलतो प्रत्येकजण देशावरी
एकटे मज राष्ट्र-ध्वज का वाटते?

(जो करे त्यालाच माहित संकटे,
अन् तुला सारे सहज का वाटते ?)

- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

डोळे

                 डोळे 
          ( वृत्त - आनंदकंद )

रडतात संथ डोळे ,करतात खंत डोळे
वणव्यापरी दिवाणे, माझे ज्वलंत डोळे

खोटा कशास बोलू , मी भाळलो न तेव्हा,
इतके खरे परंतू , आले पसंत डोळे

येतेस मध्यरात्री तू आठवून जेव्हा,
भरतात कल्पनांनी हे आसमंत डोळे

डोळ्यात वेदनेची, असते अखंड वर्दळ
क्षण पापण्या लवोनी, घेती उसंत डोळे

मेलो तरी न सरली, तुज आस पाहण्याची
मेले शरीर अवघे, होते जिवंत डोळे

- श्रीकांत चवरे
   नाशिक 

दूर तू आहेस हे होते अनावर

(वृत्त - मंजुघोषा)

दूर तू आहेस हे होते अनावर
मार्ग शोधावा कसा या अंतरावर ?

सांग दुःखाला कसे मी पांगवू रे
वेदना ही जाहली हृदयात स्थावर

सोबती नाहीस तू आता तरीही,
संपला नाही तुझा स्वप्नात वावर..

भोवताली आठवांचा हा पसारा
माझिया प्राणास ये अन् तूच सावर

रोज माझ्या पापणीचा तोल जातो
येवुनी तू आसवांचा वेग आवर

- श्रीकांत चवरे 
नाशिक / अकोला
05-09-2017

माझी पदोपदी तू केली जरी निराशा


( वृत्त - आनंदकंद )

माझी पदोपदी तू केली जरी निराशा
आहे अजून थोडी जिंकायचीच आशा

घेणे नसे कुणाशी, नाही कुणास देणे
माझ्याच जीवनाचा झाला तरी तमाशा

सारे दिले तरी तू, नाहीस तृप्त झाला
देऊन संपलो मी वेड्या मना अधाशा

ते गाव शोधतो मी, तू जेथला निवासी
ना मार्ग माहिती मज, ना भेटला नकाशा

मी दोष देत नाही सारे तुला नशीबा
पदरात घेतल्या तू माझ्या चुका जराशा

पाहू नकोस माझ्या तू अंत सोसण्याचा
कंटाळशील तूही गुंडाळशील गाशा

आयुष्य वादळांना हे झेलण्यात गेले
भीती समिंदराची नसते कधी खलाशा

मी टाळले कुणाला नाही उगाच केव्हा
आला जरी घरी तू माझ्याच रे विनाशा

- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला

लोचने ही कोरडी आला तरी का पूर हा ?


( वृत्त  - देवप्रिया / कालगंगा )

लोचने ही कोरडी आला तरी का पूर हा ?
कोणती ही वेदना अन् कोणता काहूर हा

जाणले आता तुझ्या प्रेमात आहे पेटणे
पेटण्यासाठीच केला देह मी कापूर हा

सोबती असतेस तेव्हा धावतो वेगे किती ?
काळ आता थांबला आहे किती बघ क्रूर हा..

नेहमी माझा दिलेला शब्द मी तर पाळला
अन् तुला नाही तुझा,  का ? वायदा मंजूर हा

एकटे जगण्यात येथे काय राणी फायदा ?
सोडुनी जातोय आता श्वास माझा दूर हा

- श्रीकांत चवरे 
नाशिक

भेटला नाही तुझा सहवास कायम...

( वृत्त - मंजुघोषा )

भेटला नाही तुझा सहवास कायम
सोबती आहे तुझा आभास कायम

काय केले दोन घा-या लोचनांनी ?
जाहलो राणी तुझा मी दास कायम

तू तिथे, काही तुला जाणीव नाही
सोसला मी एकट्याने त्रास कायम

आज आयुष्यात या नाविण्य नाही
भंगलेली मात्र ही  आरास कायम

प्रेम  येथे  नेहमी  राहील  माझे,
राहिला नाही जरी हा श्वास कायम

- श्रीकांत चवरे 
12-09-2017

पालवी


घेतली आता गझल हाती नवी ही
अन् फुटे दुःखास माझ्या  पालवी ही

थांबलो असतो सखे तेव्हाच मागे
आस वेडी पावलांना चालवी ही

सत्य माझ्या नेहमी ओठात येते
बोलते दुनिया मला वेडा कवी ही

आज भ्रष्टाचार हा सामान्य झाला
लागली देशास सा-या वाळवी ही

वाटते कंटाळली प्रश्नास माझ्या
जिंदगी का उत्तरांना टोलवी ही ?

एकटे काळीज हे अस्वस्थ होते
सोबतीला वेदना वाटे हवी ही

- श्रीकांत चवरे
     नाशिक 
12-09-2017

पूजन

              पूजन
( वृत्त- अनलज्वाला,  बहुस्वरी अलामत )

नास्तिक झालो, मी मूर्तीचे भंजन केले
माणसातल्या माणुसकीचे पूजन केले

माझ्यासाठी समान येथे मानव सारे
मी नाही धर्मात कधीच विभाजन केले

हात जोडुनी डोळे माझे मिटले मी, पण
विज्ञानाला डोळ्यांमधले अंजन केले

दंतकथांच्या मागे नाही गुरफटलो मी
इतिहासाच्या सत्यकथेंचे सर्जन केले

पाप आणि पुण्याची आता कुणास चिंता
मी हृदयाच्या दुःखाचे परिमार्जन केले

- श्रीकांत चवरे

  नाशिक

महागाई

रोज का वाढून ही जाते महागाई ?
कोण जाणे काय ही खाते महागाई

पाहता मज, दार जो तो लावुनी घेतो
दाखवी आता खरे नाते महागाई

मारते चाबूक आम्हा भाववाढीचे
आणि आनंदात ही गाते महागाई

ना कळे आहे तिचा हा काय जिव्हाळा !
नेमकी गरिबाघरी जाते महागाई

गाळतो मातीत आम्ही घाम रक्ताचे 
क्रूर ही रक्तात त्या न्हाते* महागाई

हा कसा आम्ही तुझा अंदाज बांधावा ?
अन् कसे व्हावे तुझे ज्ञाते* महागाई 

एकटा तू काय रे देणार श्रीकांता 
संपवीते रोज हे दाते* महागाई

  - श्रीकांत चवरे
      नाशिक
( * न्हाते - स्नान करते
  *ज्ञाते - ज्ञान असणारे
*दाते -  दान करणारे )

तुझा मार्ग माझ्या दिशेने वळावा

तुझा मार्ग माझ्या दिशेने वळावा
उराचा तुझ्या टोलनाका टळावा

जिथे शेवटी मी तुला भेटलो..; त्या
तिथे एक आसू तुझा ओघळावा

म्हणे भाग्य संधी इशा-यात देते
मलाही इशारा तुझा सापडावा...

सदा संयमाने इथे वागलो मी
नको तोल आता असा हा ढळावा

गुलाबास काटे सखे मान्य येथे,
तुला हाय ! सहवास माझा नडावा ?

उमाळा तुझ्याही गळा दाटुदे रे
असा एकतर्फीच तो का रडावा ?

कशाला कुणाची उगा वाट पाहू ?
लढा आपला एकट्याने लढावा ...

- श्रीकांत चवरे
   नाशिक

कधीही

       कधीही
कुणाची उधारी न ठेवा कधीही
फुकाचा लुटावा न मेवा कधीही

स्वतःचे असे उंच कर्तृत्व व्हावे,
न वाटो कुणाचाच हेवा कधीही

तुझ्या पावलांची मिळो धूळ आई
कुठेही घडो हीच सेवा कधीही

गड्या पूण्यकर्मे जरा ठेव मागे
न जाणार हा व्यर्थ ठेवा कधीही

जरी मी मनातून नास्तीक आहे,
न मी ठेवले नाव देवा कधीही

- श्रीकांत चवरे 
नाशिक / अकोला 


सुंदर गाणे कर श्वासांचे

  (वृत्त - पादाकुलक)

जुळुन आले जर श्वासांचे
सुंदर गाणे कर श्वासांचे

तुला भेटता भरून येते
हे कर* सखया धर श्वासांचे
(*कर = हात)

पुन्हा वेदना नवी भेटली,
पुन्हा पेटले घर श्वासांचे...

स्पंद दिलाचे धडधडले हे
सखे दाटले थर श्वासांचे

कितीक होते घुसमटलेले,
मुक्त जाहले थर श्वासांचे...

तुझ्यासोबती जीवन जगलो,
अता न मजला डर श्वासांचे

मिठीत तुझिया मिळो विसावा
चुंबन ओठी भर श्वासांचे
विश्वातुन या मी गेल्यावर,

द्वंद्व आपुले स्मर श्वासांचे
सुंदर गाणे कर श्वासांचे

- श्रीकांत चवरे
     नाशिक

जगण्यासाठी श्वास लागतो...

जगण्यासाठी श्वास लागतो
आणि तुझा सहवास लागतो

गझलेसाठी शब्द नको मज,
फक्त तुझा आभास लागतो..

दैवावर मम नाही श्रद्धा,
कर्मावर विश्वास लागतो...

सुख नुसते हे भेटत नसते,
दुःखाचाही त्रास लागतो

दुनियेच्या गर्दीत मित्रही
तुझ्यासारखा खास लागतो...

मन अन्नाने भरले नसते
मायेचाही घास लागतो...

कोणीच स्वावलंबी नाही ,
देवालापण दास लागतो...

स्वच्छ असूदे मन हे मित्रा
कुजल्यानंतर वास लागतो...

सूर्य स्वतःहुन लपला नाही,
ग्रहण जरी खग्रास लागतो...

मंदिरात जा , लावा रांगा,
अर्जन्सीला पास लागतो...!

- श्रीकांत चवरे
(नाशिक)

#(या देशाला स्वच्छ करूया
फक्त एक संडास लागतो...)

Thursday, March 3, 2016

प्रीत ही खोटा इशारा देत गेली

नेहमी डोळ्यात धारा देत गेली
प्रीत ही खोटा इशारा देत गेली

थांबलो नाही कुणाच्या आस-याला,
ही गझल वेडी सहारा देत गेली

काळजाच्या आत आले सूख नाही
वेदना दारी पहारा देत गेली

टाळले दिवसा किती मी आठवांना !
रात्र देहाला शहारा देत गेली

कोण म्हणतो मार्ग हा होता सुखाचा?
जिंदगी पायी निखारा देत गेली

- श्रीकांत चवरे
18-02-2016

Wednesday, February 3, 2016

बोचरे हृदयात राणी शल्य होते

बोचरे हृदयात राणी शल्य होते
शेवटी हातात हे वैफल्य होते

हासलो होतो जरी प्रत्येकवेळी
वेदनेचे जीवनी प्राबल्य होते

ठेवले आशेवरी मज नेहमी तू,
हे तुला जमले बरे कौशल्य होते

जाउदे देशास या सोडून त्यांना
प्रेमही त्यांचे कुठे जाज्वल्य होते?

मी बरे झाले गड्या नास्तीक झालो
कोणत्या कामास हे मांगल्य होते ?

             - श्रीकांत विजय चवरे
03-02-2016

Saturday, December 19, 2015

वाटले होतो बदल काळाप्रमाणे

वाटले होतो  बदल काळाप्रमाणे
जाहली दुःखे डबल काळाप्रमाणे

सोबतीला कोणही येणार नाही
सोड वेडी आस चल काळाप्रमाणे

राहिला शाबूत येथे तोच आहे,
मारली ज्याने मजल काळाप्रमाणे

भोवला चांगुलपणा माझा मला हा,
शेवटी केला बदल काळाप्रमाणे

केवढी निष्ठा कधी त्यांच्यात होती 
आज देतो रोज कल काळाप्रमाणे

              - श्रीकांत विजय चवरे
                         नाशिक

Sunday, December 13, 2015

तुला भेटुनी

तुला भेटुनी आज संपली सखे भ्रमंती
मला दिली तू आणि दिली मी तुला पसंती

रंग-रूप अन् शिक्षण हुंडा ठेव बाजुला 
मला बघूदे तुझ्या मनाची ही श्रीमंती

नवीन नाते दोन जिवांचे विणले जाते
हृदयाच्या कथनाला तेव्हा नको विनंती

सुंगध होउन जीवनात या दरवळ माझ्या
गुलाब हो तू कधी मोगरा अन् शेवंती

संसाराच्या वेलीवर घर इवले बांधू
नल मी होइन त्यात आणि तू हो दमयंती

वाट भासते अवघड पण दे साथ मला तू
तुझ्यासवे हा प्रवास होवो सुखकर अंती

          - श्रीकांत विजय चवरे 
                     नाशिक
29.10.15

Sunday, December 6, 2015

वेदनांना साहुनी वैराण होते....

वेदनांना साहुनी वैराण होते 
एवढी कविता कशी हैराण होते ?

भासते आहे अजुन कळ काळजाला
लोचनांचे दोन तिरपे बाण होते

आजही पडतो मनाला प्रश्न राणी
गुंतले दगडात का हे प्राण होते ?

एवढा दुःखास मीही प्रीय झालो,
मांडले त्याने नशीबी ठाण होते

ये बरा आलास मरणा शेवटी तू
केवढे माझ्या जिवाला ताण होते

           - श्रीकांत विजय चवरे
04-09-15

Thursday, November 26, 2015

नको वेदने तू पुन्हा पालवू

नको वेदने तू पुन्हा पालवू
ऋतू हासण्याचे नको घालवू

तुझ्या काजळाला सुटे ओल का?
नको लोचनी आसवे कालवू...

उरी आठवांची सुरू भैरवी,
जुने गीत माझे नको चालवू...

कसे घट्ट केले मला माहिती,
मनाला नव्याने नको हालवू...

तुझा चेहरा हा मला पाहुदे,
जरा थांब मग हा दिवा मालवू...

             - श्रीकांत विजय चवरे
                    नाशिक 
२६-११-१०१५

Friday, October 30, 2015

अशीच रात चालते

अशीच रात चालते , अशीच बात चालते...
अशीच आठवण जुनी तुझी मनात चालते ....

उगाच काढतो जुनी अशीच रोज डायरी,
हवेत ओळ ओळ अन् उदास गात चालते

कुणी नवे अनोळखी दरोज भेटतात अन्,
बघून आडनाव का मनात जात चालते ?

उधार शोधतोच मी पगार संपतो तदा,
तरी अखेर शेवटी घरात भात चालते

लढावया सदैव मी तयार राहतो उरी,
उभ्या जगात आज रोज घातपात चालते...

                       श्रीकांत विजय चवरे
                        नाशिक / अकोला

Wednesday, October 28, 2015

सजावट

                  सजावट

केली नाही सुविचारांची उरी सजावट
लाखो खर्चुन उगाच केली घरी सजावट

दान कधी तू दमडीभरही दिधले नाही,
हाय फुकाची या मेंदीची करी सजावट

कशी लपावी सांग मनाची तुझ्या गरिबी?
देहावरती या वस्त्रांची जरी सजावट

सत्कर्मांने व्यक्तित्वाचे तेज झळाळो,
हीच मैतरा आयुष्याची खरी सजावट

                        श्रीकांत विजय चवरे
                                 नाशिक
(२६-१०-२०१५)

Tuesday, October 27, 2015

कोणी गीता कुणी बायबल कुराण मिरवू

कोणी गीता कुणी बायबल कुराण मिरवू
कुणी आरती कुणी प्रार्थना अजाण मिरवू

विद्यापीठी विकत चिटो-या मिळू लागल्या
लोक लागले पांडित्याचे प्रमाण मिरवू

चंद्र नभातील या लाटांना कारण ठरला,
समुद्र अन् हा इथे लागला उधाण मिरवू

एक संस्कृती ढिगा-यात या दडली होती,
अजून आम्ही तिचे लागतो निशाण मिरवू

चिथावणारा कोणी नेता बोलुन जातो
अनुयायी हे खुळे लागती बयाण मिरवू

देश हजारो चिंतांनी हा मरू लागला
आणि लागले कुणी विदेशी प्रयाण मिरवू

                   :- श्रीकांत विजय चवरे
                        ९५९५३७४७४१
(२७-१०-२०१५)

Monday, October 26, 2015

गाफील मीच होतो सारे तयार होते...

गाफील मीच होतो, सारे तयार होते 
माझ्यावरी कराया मारे तयार होते

ही माणसे अताशा, आली नवी जराशी
ओठी जुनेच त्यांच्या नारे तयार होते

आलो तुझ्यात मीही डुंबावयास होतो
डोळे मुली तुझेही, घारे तयार होते

तेव्हा मनात होती , इच्छा न कोणतीही
अन् हे तरी तुटाया तारे तयार होते

तेव्हा जरी मुलांची, आयू लहान होती
डोक्यावरी वहाया भारे तयार होते

होताच काळजाला, ही वेदना जराशी
डोळ्यांत लाख अश्रू खारे तयार होते

तो जाळ लावणारा, तू तेल ओतणारा
अन् हे मला तळाया झारे तयार होते

मी घट्ट मूठ केली, जाऊ नये म्हणोनी
जाण्यास हे परंतू  पारे तयार होते

ही ओळ वेदनेची, आता जुळून आली
डोक्यात भावनांचे वारे तयार होते

                   :- श्रीकांत विजय चवरे
                     अकोला / नाशिक
( आवडली तर नक्की सांगा..!)

Saturday, October 24, 2015

कमाई ......


मला न जमली पैशामधली जरी कमाई
मी केलेले प्रेम आणि मैतरी कमाई

पाठीवरती हात ठेउनी आई म्हणते,-
"घामामधला छदामसुद्धा बरी कमाई !"

हाय जराशा श्रीमंतीने गर्व वाढले
माणसांचिये मधात बनते दरी कमाई

सात्त्विकतेचा बुरखा घालुन दलाल जमले
इथे चालते देवाच्याही घरी कमाई

स्मशानभूमी कब्रिस्तानी करा पहारा
पहा कोण चालला घेउनी वरी कमाई ?

जीवनभर या नोटा छापा महाल बांधा
तिरडीवर निजल्यावर कळते खरी कमाई

                - श्रीकांत विजय  चवरे

Thursday, October 22, 2015

भीमा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ही एक गझल माझ्या भीमासाठी....
                  भीमा....

तव कीर्तीचा ध्वज स्तंभावर चढवू भीमा...
पुन्हा एकदा विश्व बुद्धमय घडवू भीमा...

आकाशावर रंग पहा हा निळा फाकला,
अता करोडो मने निळ्याने मढवू भीमा

उभा ठाकला अन्यायाच्या विरोधात तू
लढा तुझा निकराने आम्ही लढवू भीमा

वाघीणीचे दूध पाजले शस्त्र दिले तू
जातीभेदाला या आता बडवू भीमा

गुलाम नाही कोणी आता समान सारे
बुरसटलेली विचारधारा अडवू भीमा

धम्मचक्र प्रवर्तनदिन हा म्हणतो आहे
पंचशील हा पाठ जगाला पढवू भीमा

           कवी- श्रीकांत विजय चवरे
                  अकोला.
© arvindanuj.blogspot.com

तव कीर्तीचा ध्वज स्तंभावर चढवू भीमा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ही एक गझल माझ्या भीमासाठी....
                  भीमा....

तव कीर्तीचा ध्वज स्तंभावर चढवू भीमा...
पुन्हा एकदा विश्व बुद्धमय घडवू भीमा...

आकाशावर रंग पहा हा निळा फाकला,
अता करोडो मने निळ्याने मढवू भीमा

उभा ठाकला अन्यायाच्या विरोधात तू
लढा तुझा निकराने आम्ही लढवू भीमा

वाघीणीचे दूध पाजले शस्त्र दिले तू
जातीभेदाला या आता बडवू भीमा

गुलाम नाही कोणी आता समान सारे
बुरसटलेली विचारधारा अडवू भीमा

धम्मचक्र प्रवर्तनदिन हा म्हणतो आहे
पंचशील हा पाठ जगाला पढवू भीमा

           कवी- श्रीकांत विजय चवरे
                  अकोला.
© arvindanuj.blogspot.com

Wednesday, October 21, 2015

सोबतीला एकटे क्षण राहिले थोडे...

सोबतीला एकटे क्षण राहिले थोडे
कोरड्या डोळ्यांत श्रावण राहिले थोडे

गुंतलो आता जरी जगण्यात मी राणी
आठवांचे आत हे कण राहिले थोडे

व्यक्त मी काव्यातुनी गझलेतुनी होतो
वाटते बोलायचे पण राहिले थोडे

चालतो देवा तुझ्या स्मरणात धिंगाणा
साजरे सात्वीक हे सण राहिले थोडे

ही जरी केली मशागत काळजाची मी
वासनांची कीड अन् तण राहिले थोडे

ये अता जन्मास तू अवनीवरी रामा
एकटी सीता नि रावण राहिले थोडे

                  - श्रीकांत विजय चवरे 
                        9595374741

Thursday, October 15, 2015

दुःख नेमके बोलत असते...

जुनी आठवण खोलत असते
दुःख नेमके बोलत असते...

नशीबही नच कळे कुणाच्या 
तालावरती डोलत असते ?

नात्यांना ही दुनिया आता
पैशामध्ये तोलत असते ...

तुला न माहित तुझ्याचसाठी 
रोज पापणी ओलत असते...

उरातल्या जखमांच्या खपल्या
नवी वेदना सोलत असते ...

वी :- श्रीकांत विजय चवरे 
            9595374741
15-10-2015

काही सुरात उरते ,काही उरात उरते

काही सुरात उरते ,काही उरात उरते
प्रेमात दुःख इतके ,माझ्या मनास पुरते...

एकांत शोधणारी, गर्दीत भेदणारी
ही धार आसवांची, डोळ्यात रोज मुरते...

गर्दीत राहताना ,बेभान वाहताना
ही ओळ वेदनेची, जाणे कुठून स्फुरते...

खोलीत काळजाच्या ,फिरुनी उगाच वेडी
हल्ली उदासवाणी, कविता मनात झुरते...

कवी :- श्रीकांत विजय चवरे 
            9595374741

Sunday, October 11, 2015

उगाच नाही .....

नशिबाने या मलाच छळणे  उगाच नाही ..!
डोळ्यांतुन या अश्रू गळणे उगाच नाही ..!!

आता कळले तुझे नि माझे ध्येय वेगळे !
या वाटेवर आली वळणे उगाच नाही !!

आधिच होती आग प्रीतिची उरात माझ्या !
प्रेमामध्ये माझे जळणे  उगाच नाही !!

सारे होते प्रेम तुझे ते खोटे राणी !
ऐनवेळी तुझे डळमळणे उगाच नाही !!

चंद्र माझिये निश्चित माझ्या जवळ असावा !
भावनांचिये लाट उसळणे उगाच नाही !!

देवाचाही कंठ जणू हा भरून आला !
पावसाचे असे कोसळणे उगाच नाही !!
   
        कवी - श्रीकांत चवरे
                 9595374741  
     arvindanuj.blogspot.com

पहिलीच भेट होती

पहिलीच भेट होती,
पहिलीच रात होती...!

मूर्ती तुझी जणू ही ,
पूर्वी उरात होती ...!!

बोलावया तुझ्याशी,
केली किती तयारी..!

पण हाय ऐनवेळी 
भीती स्वरात होती ...!!

चंद्रास आज माझा 
होणार स्पर्श होता ..

ऐशी अपूर्व संधी,
माझ्या करात होती ...!!

डोळ्यांत पाहताना 
कळले हळूच काही...

हलकेच नाव माझी ...
बुडली पुरात होती...!!

कवी :- श्रीकांत चवरे 

No comments:

Post a Comment