Monday, October 2, 2017

महागाई

रोज का वाढून ही जाते महागाई ?
कोण जाणे काय ही खाते महागाई

पाहता मज, दार जो तो लावुनी घेतो
दाखवी आता खरे नाते महागाई

मारते चाबूक आम्हा भाववाढीचे
आणि आनंदात ही गाते महागाई

ना कळे आहे तिचा हा काय जिव्हाळा !
नेमकी गरिबाघरी जाते महागाई

गाळतो मातीत आम्ही घाम रक्ताचे
क्रूर ही रक्तात त्या न्हाते* महागाई

हा कसा आम्ही तुझा अंदाज बांधावा ?
अन् कसे व्हावे तुझे ज्ञाते* महागाई

एकटा तू काय रे देणार श्रीकांता
संपवीते रोज हे दाते* महागाई

  - श्रीकांत चवरे
      नाशिक

( * न्हाते - स्नान करते
  *ज्ञाते - ज्ञान असणारे
*दाते -  दान करणारे )

No comments:

Post a Comment