#1
याला सलाम आहे, त्याला सलाम आहे
सारे करूनही हे वाळीत नाम आहे
मी बोललो कुणाला नाहीच शब्द काही
मी गाळतो कधीचा माझाच घाम आहे
हा ठोकरून देतो, तो बोकरून घेतो
वाटेतल्या कुणाला आता लगाम आहे?
आहेत भाकरी या माझ्याच चाकरीच्या
त्यांच्यासमान खाणे यारा हराम आहे
डाकू अमीर होतो, त्याची प्रसिद्ध कीर्ती
मातीत राबणारा माणूस आम आहे
माझी घडोत पुण्ये, त्यांचे बघेल दाता
सन्मार्ग हा मिळू दे, तो मार्ग वाम आहे
माणूस माणसाचा आता कुठे रहाला
सा-याच भावनांच्या आतून दाम आहे...
आता कलीयुगा दे लाखो प्रलोभने तू
माझ्या मनावरी मी शाबूत ठाम आहे
कवी - श्रीकांत विजय चवरे
----------------------------------
#2
हे कोण राहिले या गावात ओळखीचे
आले करावयाला हे घात ओळखीचे
घेऊन रूप आहे रे दोन येथ जो तो
बाहेरचेच यांचे हे दात ओळखीचे
माणूस हे दिसाया आतून सापळे अन्,
आहेत वेगळे रे हे आत ओळखीचे
माझे तुझे जिणे हे यारा असे फुकाचे
लोकांस वार येथे हे सात ओळखीचे
आंदोलने कितीही केली इथे तरीही
सारे विचारणारे हे जात ओळखीचे
आश्वासने हजारो गल्लीतही मिळाली
दिल्लीत टाकती रे हे कात ओळखीचे
साधेच बोललो मी, हा देश आपला रे
ऐकून घेत नाही ही बात ओळखीचे
चौकात लाज गेली नंगी विशाल माता
छक्केच बांधलेले हे हात ओळखीचे
आता नको रसीका तू वाजवूस टाळी
आहेत ऐकणारे हे यात ओळखीचे
कवी - श्रीकांत विजय चवरे
---------------------------------
#3
डोळ्यांत आठवांचे बघ पूर राहिले रे
आता समीप माझ्या क्षण क्रूर राहिले रे
त्या रोज रंगणा-या गेल्या सरून भेटी
श्वासात अन् रिकामे बघ ऊर राहिले रे
आलो निघून आहे भेटावया जगाला
इतरांस भेटताना घर दूर राहिले रे
मेल्यावरी कशाला जीताच मी जळालो
राखेत भावनांच्या बस धूर राहिले रे
गेलेत हाय सारे तूही निघून जाशी
ओठी तुझ्याच माझे पण सूर राहिले रे
कवी - श्रीकांत विजय चवरे
----------------------------------
#4
खोलीत दाटलेला अंधार धूर आहे
दुःखात गांजलेला येथे मजूर आहे
आर्ध्या उपासपोटी जाते निजून आई
ते चंद्र भाकरीचे आकाश दूर आहे
आले कसे कळेना हे घोष हाय कानी
"होई महान सत्ता" जोशात सूर आहे
घेऊन फास माझा केव्हाच बाप मेला
आता तुझे कशाला दाटून ऊर आहे
होतील शस्त्र माझी ही आसवे उद्याला
गाळू नकोस यांना यांच्यात पूर आहे
आता न अंत माझ्या पाहूस सोसण्याचा
माझ्यातही लढाया पेटून शूर आहे
कवी - श्रीकांत विजय चवरे
-----------------------------------
#5
तुला आठवू मी किती आठवू मी
किती हुंदक्यांनी गळा दाटवू मी?
किती दुःख माझ्या उरी साठलेले
नवे दुःख आता कुठे साठवू मी?
तुझ्या आठवांनी धरा व्यापलेली
मला सांग आता कुठे पाठवू मी
कितीदा उभा ठाकलो मी जगाया
कितीदा नव्याने मला थाटवू मी
जगालाच मी हे दिले प्रेम माझे
किती प्रीतिचा हा झरा आटवू मी
कितीदा असा हा फुका जन्म गेला
कितीदा विधात्या धरा बाटवू मी
असे मीहि माणूस , माणूस तोही
किती नाटकी या उरा फाटवू मी...
कवी - श्रीकांत विजय चवरे