Monday, December 25, 2023

चढतोय चढ कधीचा नाही उतार कुठला

माझ्याकडे सुखाचा नाही प्रकार कुठला


कुठलेच दुःख आता आश्चर्य देत नाही

मी झेलला न ऐसा नाही प्रहार कुठला


काहीच जीवनाचे माझ्याकडे न बाकी

व्यवहार ठेवला मी नाही उधार कुठला


मी वागलो कधीही माझ्या मनाप्रमाणे

केला मुळीच नाही आधी विचार कुठला


का राबतात माझी निंदा करायला ते ?

त्यांना न मानधन अन् नाही पगार कुठला


मी नेहमीच माझा सांभाळलाय दर्जा

लिहिला खायलसुद्धा नाही सुमार कुठला


होते मनात माझ्या ते बोललोच नाही

आला म्हणून तर मज नाही नकार कुठला


जगलोत फक्त येथे केले न भिन्न काही

जगण्यामधून अपुल्या आला न सार कुठला

No comments:

Post a Comment