Saturday, April 29, 2017

घर

(वृत्त - हरिभगिनी / स्वरगंगा - ८+८+८+६= ३० मात्रा)
आईच्या मायेने सजते फुलासारखे निर्मळ घर...
थंडी वारा ऊन पाऊस आणि झेलते वादळ घर...
कडुलिंबाच्या झाडापाशी गार सावली बागळते...
एक जोडपे चिवचिवणारे नित्य तिथे ते घुटमळते...
आणि जुन्या विहिरीच्या काठी रोज पाहते पिंपळ घर...
आईच्या मायेने सजते फुलासारखे निर्मळ घर...||१||
घरात असती आई बाबा, आजी आजोबा ताई...
आजोबा देती खाऊ अन् आजी सांगे नवलाई...
घर बापाचा धाक असे अन् संस्कारांचे काजळ घर...
आईच्या मायेने सजते फुलासारखे निर्मळ घर...||२||
सडा सारवण रोज सकाळी अन् दारावर रांगोळी...
"उठा उठा" आजोबा म्हणती, "पटपट उरका आंघोळी"...
आनंदाचे क्षण वेचाया अलगद बनते औंजळ घर
आईच्या मायेने सजते फुलासारखे निर्मळ घर...||३||
घर असते सगळ्यांच्यासाठी घरात असतो एकोपा...
निवांत आईच्या मांडीवर डोके ठेवुनिया झोपा...
बाळाचा नटखट धिंगाणा अन् छकुलीचा गोंधळ घर
आईच्या मायेने सजते फुलासारखे निर्मळ घर...||४||
घर होते आधी ते राणी आता नुसत्या आठवणी...
आता उरल्या इमारती अन् स्वार्थाची सगळी करणी...
घर आताचे घर नाही हे, नावासाठी केवळ घर...
आईच्या मायेने सजते फुलासारखे निर्मळ घर...||५||
- श्रीकांत चवरे
   ( नाशिक )

No comments:

Post a Comment